
आयकर विभागने काँग्रेस आमदार निलय डागा यांच्या सोलापुर येथील ठिकाणाहून 7.50 कोटी रुपये रोख रक्कम जप्त केली आहे. डागा बंधूंच्या विविध ठिकाणांवर १८ फेब्रुवारीपासून छापेमारी सुरु आहे. जप्त केलेल्या रकमेचा स्त्रोत डागा बंधू देऊ शकलेले नाही.
भोपाळ - बैतूलचे काँग्रेस आमदार आणि उद्योगपती निलय डागा यांच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाचा छापा पडला आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशातील या आमदारांच्या सोलापूर येथील तेल कारखान्यावर पडेलेल्या छाप्यात साडे सात कोटी रुपये रोख सापडले आहेत. ही सर्व रक्कम सुटकेस आणि गोण्यांमध्ये भरुन ठेवण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार डागा यांचा एक कर्मचारी नोटांनी भरलेल्या बॅग आणि गोण्या घेऊन पसार होत असताना पकडला गेला आहे. भोपाळ आयकर विभागाच्या इतिहासात एवढी मोठी रक्कम सापडण्याची ही पहिली वेळ आहे.
चार दिवसांपासून आमदार डागांच्या ठिकाण्यांवर छापे
आयकर विभागाचे अधिकारी चार दिवसांपासून आमदार निलय डागा यांच्या बैतूल, सोलापूर आणि कोलकाता येथील जवळपास २० ठिकाणांवर तपास करत आहे. यामध्ये डागा यांचे काही निवासस्थानही आहेत. डागा यांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरु असतानांच अद्याप त्यांचे पाच बँक लॉकर्स उघडणे बाकी आहे. तसेच या छापेमारीत विभागाला अनेक बनावट (शेल कंपनी) कंपन्यांचीही माहिती मिळाली आहे. या शेल कंपन्यांच्या नावे जवळपास २०० कोटींची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत. अधिकाऱ्यांना शंका आहे की गैरमार्गाने मिळवलेल्या पैशांना चलनात आणण्यासाठी या कंपन्या काम करत असल्या पाहिजे.
हवालाची संबंध असल्याची शक्यता
१८ फेब्रुवारीपासून आमदार डागा यांच्या निवासस्थान, कंपन्या आणि कार्यालयावर छापेमारी सुरु आहे. चार दिवसांपासून सुरु असलेल्या या कारवाईत सोलापूरमध्ये ऑईल मिल, क्रेडिट सॉफ्टवेअर कंपनी, दाल मिल, पब्लिक स्कूल आणि निवासस्थान असल्याचे समोर आले आहे. याशिवाय मुंबई आणि कोलकाता येथील त्यांच्या २० ठिकाणांवर १८ फेब्रुवारीपासून छापेमारी सुरु आहे. आतापर्यंत सोलापुरात मिळालेले साडेसात कोटी नगदीसह ८.१० कोटीर रुपये रक्कम मिळाली आहे. डागा आणि त्यांचे बंधू या संपत्तीचा स्त्रोत अद्याप सांगू शकलेले नाही.