
पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत. ईशान्येकडील राज्यातील विविध विकासयोजना या आगामी काळात देशाच्या विकासाचं इंजिन बनणार आहेत. पूर्वीच्या सरकारांनी आसाम आणि ईशान्येकडे राज्यांना सावत्र आईसारखी वागणूक दिली, असे मोदी म्हणाले. धीमाजी जिल्ह्यात आयोजीत सभेत ते बोलत होते.
दिसपुर - यंदा आसामच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी धीमाजी जिल्ह्यात एका सभेला संबोधीत केले. ईशान्येकडील राज्यातील विविध विकासयोजना या आगामी काळात देशाच्या विकासाचं इंजिन बनणार आहेत. पूर्वीच्या सरकारांनी आसाम आणि ईशान्येकडे राज्यांना सावत्र आईसारखी वागणूक दिली, असे मोदी म्हणाले. गेल्या एका महिन्यात मोदींचा हा तिसरा आसाम दौरा आहे.
यावेळी मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात आलं. तेल आणि वायू क्षेत्रातल्या महत्त्वाच्या प्रकल्पांचं लोकार्पण करण्यात आलं. यामध्ये इंडियन ऑईलच्या तेल शुद्धिकरण प्रकल्पाचं इंडमॅक्स युनिट, मधुबन इथल्या ऑईल इंडिया लिमिटेडचं सेकंडरी टँक फार्म या प्रकल्पांचा समावेश आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते धेमाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचंही उद्घाटन करण्यात आलं आणि सुआलकुची अभियांत्रिकी महाविद्यालयाची कोनशिला बसवण्यात आली.
पंतप्रधान मोदी यांनी येथे मत्स्यपालक शेतकरी आणि मत्स्यव्यवसाय मंत्रालयावर भाष्य केले. मत्स्य व्यवसायावर विशेष भर देऊन सरकारने स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे. मत्स्यपालनाला चालना देण्यासाठी सरकार खर्च करत आहेत. मत्स्य व्यवसायाशी संबंधित शेतकऱयांसाठी 20 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आले आहे, याचा फायदा आसाममधील लोकांनाही मिळेल, असे ते म्हणाले.
आत्मनिर्भरतेचा पाया -
आसाममधील तरुणांमध्ये आश्चर्यकारक क्षमता आहे. सरकार महाविद्यालये स्थापन करीत आहे. आसाममध्ये चहा, पर्यटन, हस्तकलेची शक्ती आहे. जर मुले ही कौशल्ये फक्त शाळा-महाविद्यालयातूनच शिकत असतील तर आत्मनिर्भरतेचा पाया तिथून जोडला जाईल, असेही ते म्हणाले.