
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अनेक रेल्वे प्रकल्पांचे तसेच नोआपारा ते दक्षिणेश्वर या मेट्रो रेल्वेच्या विस्ताराचे उद्घाटन केले.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालचा दौरा केला. यावेळी त्यांनी हुगळी येथे एका सभेला संबोधीत केले. बंगालमध्ये भाजपाचेच सरकार स्थापन होणार, असा विश्वास त्यांनी सभेत व्यक्त केला. तसेच यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. तथापि, पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अनेक रेल्वे प्रकल्पांचे तसेच नोआपारा ते दक्षिणेश्वर या मेट्रो रेल्वेच्या विस्ताराचे उद्घाटन मोदींच्या हस्ते झाले.
'मां, माटी, मानुष' ही घोषणा देणारे लोक बंगालच्या विकासासमोर एक भिंत म्हणून उभे राहिले आहेत. बंगालमधील शेतकऱ्यांना ममता बॅनर्जी पीएम-किसान सन्मान योजनेचा लाभ मिळू देत नाहीत. इथल्या सरकारमध्ये बसलेल्या लोकांनी त्यांचा हक्क हिसकावून घेतला आहे, अशी टीका मोदींनी केली.
बंगालमध्ये भाजपाचे सरकार स्थापन होईल. तेव्हा प्रत्येक बंगाली आपल्या संस्कृतीचे गौरव करण्यास सक्षम असतील. त्यांना कोणालाही घाबरण्याची गरज नाही. भाजपा सोनार बंगालच्या निर्मितीसाठी काम करेल, असे मोदी म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये सत्ता बदल होणार आहे. जलद विकासाचा संकल्प सिद्ध करण्यासाठी बंगाल एक मोठे पाऊल उचलत आहे. सरकारकडून इंफ्रास्ट्रक्चरवर अभूतपूर्व भर दिला जात आहे. यासाठी गुंतवणूक केली जात असून एक विशेष शेतकरी रेल्वे सुरू करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील छोट्या शेतकर्यांना याचा फायदा मिळत आहे. महाराष्ट्रातील सांगोला ते पश्चिम बंगालमधील शालीमारपर्यंत शेतकरी रेल्वे चालवण्यात येत आहे, असे मोदी म्हणाले.
पूर्वीच्या सरकारने प्रदेशाचा विकास केला नाही -
बंगालच्या भूमीत कृष्ण परमहंस सारख्या महान संतांचा जन्म झाला. माउंट एव्हरेस्ट मोजणारे थोर गणितज्ञ राधानाथ सिगर, महान भाषाशास्त्रज्ञ भूदेव मुखर्जी यांचे नातेही बंगालच्या भूमीशी आहे. आतापर्यंत बंगालमध्ये सत्ता करणाऱ्या सरकारांनी प्रदेशाचा विकास केला नाही. त्यांनी ऐतिहासिक परिसराचे जतन केले नाही, असे मोदी म्हणाले.