
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.
मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.
हेही वाचा - कुख्यात गँगस्टर रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी
पालिका सज्ज -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून पालिकेचा आरोग्य विभाग गेले अकरा महिने विविध उपायोजना केल्याने कोरोना आटोक्यात आला होता. कोरोनाचे दिवसाला ३०० ते ४०० रुग्ण आढळून येत असतानाच १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोना रुग्णांचा आकडा सोमवारी ९०० च्या वर गेला होता. कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने मंगल कार्यालये, समारंभ, पब, रेस्टोरंट, बार, चौपाट्या, रेल्वे ट्रेनमध्ये मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी ५० च्या वर व्यक्ती दिसत आहेत अशा मंगल कार्यालये, पब बारवर दंडात्मक आणि फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहेत. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये गणेशोत्सव दरम्यान २ हजाराच्या वर रुग्णसंख्या गेली होती. त्यावेळी ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या त्या उपायोजनांची पुन्हा अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा - पालघरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव, 45 कोंबड्यांचा मृत्यू
आढावा बैठक -
मुंबईसह राज्यात रुग्णसंख्या वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधला आहे. नागरिकांना लॉकडाऊन नको असल्यास नागरिकांनी मास्क वापरण्याचे, सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. लॉकडाऊन किंवा नाईट कर्फ्यू लावण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. त्याचवेळी नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सर्व जिल्हा प्रशासनांना दिले आहेत. मुंबईतही रुग्णसंख्या वाढत आहे. मुंबई हि देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढ रोखणे गरजेचे आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पालिका आयुक्तांकडून कोणत्या उपायोजना करण्यात आल्या त्याची माहिती घेऊन कडक निर्बंध लावण्याचे आदेश देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.