
देशात इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीची फास्टॅग ही प्रणाली लागू झाली आहे. मात्र अनेकवेळा फास्टॅग स्कॅन न झाल्याने, वाहनधारकांना दुप्पट टोल भरावा लागत होता. आता फास्टॅग स्कॅन न झाल्यास वाहनधारकांना विना टोल जावू दिले जाणार आहे. यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई - देशात इलेक्ट्रॉनिक टोल वसुलीची फास्टॅग ही प्रणाली लागू झाली आहे. राज्यात एमएसआरडीसी (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) च्या काही टोलनाक्यांवर याची 100 टक्के अंमलबजावणी होण्यास अजून महिन्याभराचा काळ आहे. पण राज्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर याची 100 टक्के अंमलबजावणी सुरू आहे. मात्र अनेक ठिकाणी अधिकृत फास्टॅग असताना ही तो स्कॅन होत नसल्याने वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागत होता. पण आता मात्र या अडचणीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. कारण आता अधिकृत फास्टॅग स्कॅन न होणे ही तांत्रिक चूक मानत, वाहनचालकाला विना टोल जाऊ देण्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. हा वाहनचालकांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
अनेकांकडून 'फास्टॅग' 'स्लोटॅग' झाल्याच्या तक्रारी
राष्ट्रीय महामार्गावर विना फास्टॅग प्रवास करता येत नाही. असा प्रवास केला तर तो महागात पडत आहे. त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जात आहे. राज्यात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि वांद्रे-वरळी सी लिंकवर फास्टॅगची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या मार्गावर केवळ 2 लेन हायब्रीड लेन म्हणून ठेवण्यात आल्या आहेत. विना फास्टॅग हायब्रीड लेनऐवजी फास्टॅग लेनमधून गेल्यास दुप्पट टोल घेतला जात आहे. अशावेळी आता राज्यात फास्टॅग लावून घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मात्र त्याचवेळी फास्टॅग स्कॅन होत नसल्याच्या तक्रारी आहेत. फास्टॅग खात्यात पैसे असताना ही दुप्पट टोल द्यावा लागत असल्याने वाहनचालक नाराजी व्यक्त करत आहेत. याचा फटका नुकताच प्रसिद्ध कवी संदीप खरे यांनाही बसला होता. यावर त्याने संताप व्यक्त करताना हा फास्टॅग नव्हे स्लोटॅग असल्याचे म्हटले होते.
यामुळे फास्टॅग स्कॅन होत नाही
फास्टॅग स्कॅन न होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. यातील एक कारण म्हणजे सध्या बोगस फास्टॅगची विक्री सुरू आहे. त्यामुळे बोगस स्टिकर असल्यास ते स्कॅन होत नाही, व वाहनचालकांना दुप्पट टोल भरावा लागतो. त्यामुळे वाहनधारकांनी अधिकृत फास्टॅगच लावावेत असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दुसरे म्हणजे तात्रिक अडचणींमुळे फास्टॅग स्कॅन होत नाही. याचा फटका वाहनधारकांना बसू नये म्हणून आता फास्टॅग स्कॅन न झाल्यास त्या वाहनाकडून टोल वसूल केला जाणार नसल्याच्या नियमाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.