
महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे नागपुरात शाळा बंद ठेवण्याचे आदेश महापौरांनी दिले असून काहि ठिकाणी मंदिरेही बंद करण्यात आली आहेत.
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच अनेक ठिकाणी नियम धाब्यावर बसवल्याचेही दिसून येत आहे. मंत्री आणि नेत्यांच्या मुलांच्या लग्नात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडवला जात आहे. त्यातच नागपूरसारख्या उपराजधानीच्या शहरात शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. एकनाथ खडसे, मंत्री सतेज पाटील, राजेश टोपे यांच्यानंतर आता छगन भुजबळ यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्यात चिंता वाढली आहे. काही ठिकाणी मंदिरेही बंद करण्यात आली आहेत. रवीवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेलाच लॉकडाऊन पाहिजे का नाही असा प्रश्न विचारला आहे. एक आठवड्याचे अल्टिमेटमच त्यांनी दिले आहे. परिस्थिती हाताबाहेर जात असताना आणखी कडक उपाययोजना करण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत.
मुंबईत लॉकडाऊनचा पालकमंत्र्यांचा इशारा -
मुंबईतही कोरोना हातपाय पसरू लागला आहे. पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात मुंबई अडकली तर त्यातून बाहेर निघणे कठीण होणार आहे. त्यामुळे कोरोनाचे नियम काटेकोरपणे पालन करा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा, असे आवाहन मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केले आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासन सर्वोतोपरी प्रयत्न करत असून, नागरिकांनीही नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. जर मुंबईकरांनी नियम पळाले नाही तर नाईलाजास्तव पुन्हा लॉकडाऊन लावावे लागेल, असा इशारा मुंबईचे पालकमंत्र्यांनी दिला आहे.
नागपुरात ७ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद -
कोरोनाचे वाढते संकट पाहता नागपूर शहरातील पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी महानगरपालिका प्रशासनाला दिले आहेत. नववी आणि दहावी या वर्गांच्या परीक्षा घेणे गरजेचे असल्याने कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून त्यांच्या परीक्षा घेतल्या जातील. खासगी शिकवणी वर्गांमध्येही कडक तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती तिवारी यांनी दिली.
पुण्यात रात्रीची संचारबंदी -
पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नियंत्रित संचार राहील, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 200 व्यक्तींच्या उपस्थितीत मर्यादित लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.
पुण्यात माजी खासदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, पवारांची उपस्थिती -
राज्य शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली असतानाही पुण्यात मात्र, भाजपचे नेते तसेच माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी गर्दी करत कोरोना नियमावली धाब्याबर बसविल्याचा प्रकार समोर आला आहे. या लग्नात 200 पेक्षा जास्त जणांची उपस्थिती होती. एकीकडे कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लग्न सोहळे राजकीय कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. फक्त दोनशे लोकांनाच विवाह सोहळ्यासाठी परवानगी दिली जाईल असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त पुण्यातील हडपसरमध्ये रविवारी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे कसलेही पालन झाले नाही. या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांसह 200 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहिल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यातील अनेकांनी मास्क घातला नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसत होते. तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही यावेळी फज्जा उडाला होता.
काही मंत्र्यांनाही कोरोना -
राज्यात जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना असतानाच नेतेही त्यापासून वाचलेले नाहीत. नुकतेच मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचबरोबर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. अलिकडच्या काळात मंत्री सतेज पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांनाही कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे.
अमरावतीत सात दिवसांचे लॉकडाऊन -
अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी विकेंड लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आढावा बैठक घेतली. यात अमरावती शहर व अचलपूर शहरात सात दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे.
पंढरपुरातील विठ्ठल मंदिर बंद -
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा माघी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी दोन दिवस बंद असणार आहे. उद्या (२३ फेब्रुवारी)ला एकादशीच्या दिवशी पंढरपुरात संचारबंदी असणार आहे. पोलीस प्रशासनाने पंढरपूरकडे येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. फक्त एसटी बस सेवा सुरू राहणार आहे.
शिर्डी साईबाबा मंदिरात कोरोना नियम धाब्यावर -
शिर्डीत साईबाबांचा दर्शनासाठी भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये अंतर राखले नसल्याचे दिसून आले आहे. एवढेच नाहीत तर कित्येक भाविक विना मास्क मंदिर परिसरात वावरताना दिसत आहेत.
औरंगाबादच्या पैठण येथील संत एकनाथ मंदिर पूर्णतः खुले न ठेवण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहेत.
जळगाव बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश नाही -
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. जिल्हा प्रशासनाकडून कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, असे असताना जळगावातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी लिलावाच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. बाजार समितीत यापुढे किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश नाकारण्यात येणार असून, फक्त घाऊक विक्रेत्यांना टप्प्याटप्प्याने प्रवेश द्यावा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी काढले आहेत.
राज्यातील कोरोनाग्रस्तांचा वाढता आलेख -
राज्यात 14 फेब्रुवारीला 4092, 15 फेब्रुवारीला 3365, 16 फेब्रुवारीला 3663, 17 फेब्रुवारीला 4787, 18 फेब्रुवारीला 5427, 19 फेब्रुवारीला 6112, 20 फेब्रुवारीला 6281 तर २१ फेब्रुवारीला 6971 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसात रुग्णांच्या आणि मृत्यूच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
२१ फेब्रुवारीपर्यंत खालील विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई पालिका - 921, ठाणे पालिका - 177, नवी मुंबई पालिका - 123, कल्याण डोंबिवली पालिका - 150, नाशिक पालिका - 291, अहमदनगर - 103 जळगाव - 122, जळगाव पालिका - 155, पुणे पालिका - 640, पिंपरी चिंचवड पालिका - 291, औरंगाबाद पालिका - 103, नांदेड पालिका - 103, अकोला पालिका - 145, अमरावती - 260, अमरावती पालिका - 666, यवतमाळ - 96, बुलढाणा - 216, वाशीम - 126, नागपूर - 160, नागपूर पालिका - 599, वर्धा - 124