
राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदीरांमध्ये कोरोना नियमांची कडक अंमलबाजवणी करण्यात येत याहे.
मुंबई - राज्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. सोशल डिस्टंन्सिंग आणि इतर कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याने हा आकडा वाढत असल्याचे बोलले जात आहे. मंदिरे खुली केल्यानंतर त्या ठिकाणी सोशल डिस्टंनसिंग आणि इतर नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर आजपासून दोन दिवस बंद -
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या आषाढी, कार्तिकी यात्रेनंतर आता माघी यात्रा सोहळा रद्द करण्यात आला आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे मंदिर भाविकांसाठी आज उद्या असे दोन दिवस बंद असणार आहे. उद्या एकादशी दिवशी पंढरपुरात संचारबंदी असणार आहे. त्यामुळे मंदिर परिसरात तुरळक गर्दी या निमित्ताने पाहायला मिळत आहे, तर पोलीस प्रशासनाकडून बॅरिकेटच्या साह्याने पंढरपूरकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. फक्त एसटी बस सेवा सुरू राहणार आहे.
अंबाबाई मंदिरात कोरोना नियमावलींचे काटेकोरपणे पालन -
राज्यातील काही मंदिरे दर्शनासाठी बंद करण्यात आली आहेत. मात्र, कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर बाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अंबाबाई मंदिरामध्ये कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकाही भक्ताला किंवा मंदिरातील कर्मचारी तसेच पुजाऱ्यांना कोरोनाची लागण झालेली नाही. प्रशासनाकडून सुद्धा याबाबत कोणतेही आदेश आले नसल्याने मंदिर सुरूच राहणार असून नियमांचे पालन मात्र आता अधिक कडक केले जाणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी म्हंटले आहे. मात्र, संभाव्य धोकासुद्धा नाकारता येत नाही. प्रशासनाने अद्याप आम्हाला कोणतही आदेश दिले नाहीत. जेंव्हा प्रशासनाकडून आदेश येतील तेंव्हा पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचेही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
शिर्डीत कोरोना नियमांचे उल्लंघन -
शिर्डीत साईबाबांचा दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीत अंतर न राखणे आणि अनेकांनी मास्क न वारल्याचे दिसुन येत आहे. अनेक भक्त मास्क न लावता घोळक्यावे फिरतांना दिसतात. साईंच्या दर्शनासाठी पास काढतांना आणि रांगेत उभे राहतांना भक्त अगदी चिटकुन उभे राहत असल्याच दिसुन आले. त्यातच शिर्डी पोलिस स्टेशनच्या वाहतूक शाखेने अनोखी गांधीगिरी करत दर्शनाला आलेल्या भाविकांना व रस्त्याच्या कडेला बसलेले भिक्षेकरी,वृद्ध महिला आणि लहान बालके यांना मास्कचे वाटप करत स्वतःची काळजी घेण्याचे आणि मास्क वापरून कोरोना पासून बचावाचे आवाहन केले. यावेळी काही तरुणांना दंडात्मक कारवाईलासुद्धा सामोरे जावे लागले.