
भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी शाही विवाह सोहळा पार पडला. त्यानिमित्त रविवारी पुण्यातील हडपसर परिसरात एका रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांसह 200 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित असल्याची माहिती आहे.
पुणे - राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. पुण्यातही कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ दिसून येत आहे. राज्य शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक नियमावली लागू करण्यात आली असतानाही पुण्यात मात्र, भाजपचे नेते तसेच माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय नेत्यांनी गर्दी करत कोरोना नियमावली धाब्याबर बसविल्याचा प्रकार समोर आला आहे.
200 पेक्षा जास्त जणांची उपस्थिती-
एकीकडे कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी लग्न सोहळे राजकीय कार्यक्रम आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. फक्त दोनशे लोकांनाच विवाह सोहळ्यासाठी परवानगी दिली जाईल असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, भाजपचे नेते धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या विवाहानिमित्त पुण्यातील हडपसरमध्ये रविवारी आयोजित केलेल्या रिसेप्शनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे कसलेही पालन झाले नाही. या कार्यक्रमाला सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांसह 200 पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहिल्याची माहिती आहे.
या राजकारण्यांची होती उपस्थिती-
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रामदास आठवले, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, उदयनराजे भोसले, प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यातील अनेकांनी मास्क घातला नसल्याचे चित्र या ठिकाणी दिसत होतं. तसेच सोशल डिस्टन्सिंगचाही यावेळी फज्जा उडाला होता.
दुसरीकडे पालघरमध्ये लग्न समारंभांवर कारवाई -
एकीकडे भाजप नेत्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात राजकीय नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. मात्र दुसरीकडे पालघरमध्ये जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कोरोनाबाबतचे नियम व अटींचे कारण देत एकाच रात्री तीन ठिकाणी लग्न समारंभात धाडी टाकत कारवाई केली. यावेळी या समारंभांना 50 पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
लग्न समारंभात तीन ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचे धाडसत्र -
पालघरमधील शिरगाव, सातपाटी, बिरवाडी अशा तीन ठिकाणी लग्न समारंभांच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी रात्री धाड टाकली. त्यावेळी लग्न समारंभात 50 हून अधिक नागरिक आढळून आले. तसेच कोरोना बाबतच्या नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले होते.
गुन्हा दाखल -
या तिन्ही लग्न समारंभांमध्ये अवास्तव गर्दी आणि कोरोना नियम तसेच अटींचे पालन न केल्याने नवरदेवाचे पिता, रिसॉर्ट मालक, केटरर्स, डीजे मालक यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी कारवाई केली. सातपाटी व भोईसर पोलीस ठाण्यात नवरदेवाच्या पित्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना बाबतचे नियम पाळण्याचे आवाहन-
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणे बंधनकारक असून कोरोनाविषयी नियम व अटींचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.माणिक गुरसळ यांनी केले आहे. नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.