
शहर आणि अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात सात दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे.
अमरावती - अमरावती शहर आणि अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात सात दिवसांची टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी टाळेबंदीचा निर्णय घेतला आहे. उद्या (दि.२२ सोमवार) सायंकाळी आठ वाजल्यापासून एक आठवड्यासाठी टाळेबंदी लागू असणार आहे.
टाळेबंदीमध्ये अत्यावश्यक सेवा सुरळीत राहणार आहेत. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे. सगळ्यांची काळजी घेण्याची गरज असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे. त्यामुळे अमरावतीकरांनी याचे पालन करावे. आम्हाला आता नाईलाजास्तव फक्त जीवनावश्यक वस्तूंची सेवा सुरू ठेवावी लागणार आहे. इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असणार आहेत. तसेच शहरातील बाजार हे मार्गदर्शक सूचनांनुसारच सुरू राहतील. टाळेबंदी करण्याची इच्छा नाही, मात्र कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने हा निर्णय घेत असल्याचे पालकमंत्री ठाकूर यांनी यावेळी सांगितले.