
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आकडा बघता हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवारी लग्न समारंभ आयोजित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विवाहसोहळा आयोजित करण्यापूर्वी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगीविना लग्न समारंभ आयोजित करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले
हिंगोली- दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत चालेली असल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाची वाढती रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात विवाह समारंभासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. परवानगीविना विवाह समारंभाचे आयोजन केल्यास वधू पक्ष व वर पक्षातील नागरिका विरुद्ध कोरोनाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. हा आदेश आरोग्यहितासाठी असला तरी लग्न सोहळ्यासाठी सज्ज असलेल्या वधू-वर पक्षांची चांगलीच आता तारांबळ उडणार आहे.
लग्नासाठी पूर्व परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई-
हिंगोली जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. त्यामुळे पुन्हा आरोग्य यंत्रणा व हिंगोलीचे प्रशासन गतीने कामाला लागले आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. कोरोना वाढत असला तरीही नागरिकांना कोणतीही चिंता नसून मोठ्या थाटामाटात लग्नसमारंभ सुरू आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अशा प्रकारचे कार्यक्रम कारणीभूत ठरत आहेत. नागरिकांचा हा बेजबाबदारपणा रोखण्यासाठी प्रशासानाकडून कठोर पाऊल उचलण्यात आली आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा आकडा बघता हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी मंगळवारी लग्न समारंभ आयोजित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नवे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार विवाहसोहळा आयोजित करण्यापूर्वी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगीविना लग्न समारंभ आयोजित करणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले असून, संबंधित लॉन्स व मंगल कार्यालयास सील ठोकून मंगल कार्यालय चालकाविरुद्ध गुन्हे नोंद करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
व्हीआरआरटी पथक ठेवणार आता लक्ष-
जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन काटेकोरपणे करावे लागणार आहे, जर हे पालन करताना कोणी आढळले नाही तर त्या ठिकाणी हे पथक धडक देऊन कारवाई करणार आहे. त्यामुळे आता कोरोना नियमाचे पालन करणे हे हिंगोलीकरांना बंधनकारक झाले आहे. एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातही आता त्या सूचनांचे पालन करणे महत्त्वाचे असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता प्रशासन चांगलाच धडा शिकवणार आहे.
वधू-वर पक्षासमोर अनेक प्रश्न
शहरी व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात विवाह समारंभांचे आयोजन केले जात आहे. मात्र मंगळवारी उशिरा जिल्हाधिकारी यांचे आदेश धडकल्याने वधू वर पक्षाकडील मंडळींना चांगलाच धक्का बसला आहे. विशेष म्हणजे या आदेशांमध्ये विवाह समारंभ करण्यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता अनेकांनी विवाह समारंभाची संपूर्ण तयारी केली असून विवाह पत्रिका देखील वाटप केल्या आहेत. त्यामुळे आता इथून पुढे होणाऱ्या विवाह सोहळ्यांचे नियोजन कोलमडणार आहे. त्यामुळे अनेक वधु-वर पक्षाकडील मंडळी समोर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत.