कोरोनाला खुलेआम निमंत्रण; जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
Breaking

देशात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. मध्यंतरी कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, गेल्या आठ दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नागरिकांना याचे गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. अनेक बाजारपेठांमध्ये नागरिक विनामास्क फिरत असून सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन करत नाहीत.

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने सुरू आहे. दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोनाचे नवे पॉझिटिव्ह रुग्ण समोर येत आहेत. एवढी विपरीत परिस्थिती असताना जळगावकर मात्र, स्वतःच्या आरोग्याच्या बाबतीत कमालीचे बेफिकीर असल्याचे पहायला मिळाले. कृषी उत्पन्न बाजार समितीत पहाटेच्या वेळी होणाऱ्या भाजीपाला व फळांच्या लिलावावेळी दररोज हजारोंच्या संख्येने गर्दी उसळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला जळगावातील नागरिकांनी केराची टोपली दाखवली आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारीच नाही तर शेतकरी आणि ग्राहकांना देखील सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, निर्जंतुकीकरण अशा खबरदारीच्या उपाययोजनांचे गांभीर्य नसल्याने कोरोनाला खुलेआम निमंत्रण मिळत आहे. बाजार समितीत जिल्ह्यासह परजिल्ह्यातील व्यापारी व शेतकरी शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यासाठी येतात. अशा परिस्थितीत एखादा कोरोनाबाधित व्यक्ती त्या ठिकाणी दाखल झालेला असेल तर एकाच वेळी शेकडो जणांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हेच शेतकरी, व्यापारी जळगावातून बाहेर देखील कोरोनाचा प्रसार करू शकतात. अशा परिस्थितीत प्रशासन आणि महानगरपालिकेने धडक कारवाई करण्याची गरज आहे.

हजारोंच्या संख्येने होते गर्दी -

जळगाव शहरात कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित फळे व भाजीपाला मार्केट आहे. याठिकाणी दररोज पहाटे 5 वाजल्यापासून शेतीमालाचा जाहीर लिलाव केला जातो. या मार्केटमध्ये दीडशेहून अधिक नोंदणीकृत व्यापारी आणि आडते आहेत. जळगावसह राज्यातील इतर जिल्हे आणि परराज्यातून याठिकाणी फळे व भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणावर आवक होते. पहाटे 5 ते सकाळी 10 वाजेपर्यंत लिलाव सुरू असतो. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेला असताना मार्केटमध्ये दररोज हजारोंच्या संख्येने शेतकरी, व्यापारी, आडते तसेच माल घेणारे किरकोळ विक्रेते येतात. याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन होत आहे. अनेक व्यापारी आणि ग्राहक तोंडावर मास्क देखील बांधत नाहीत. मालाचा लिलाव करताना व्यापारी आणि शेतकरी एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखत नाहीत.

बाजार समिती प्रशासन म्हणते, गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य नाही -

फळे व भाजीपाला मार्केटमध्ये दररोज उसळणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाचे म्हणणे आहे. याठिकाणी लिलावावेळी होणारी गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाने यापूर्वी कोरोनाचा उद्रेक झालेला असताना अनेक वेळा बाजार समितीच बंद ठेवली होती. मात्र, शेतीमाल हा नाशवंत असल्याने, शिवाय हातावर पोट असणाऱ्या लोकांचे हाल पाहता बाजार समिती जास्त दिवस बंद ठेवणे शक्य नव्हते. त्यामुळे प्रशासनाने बाजार समितीत सशर्त लिलाव सुरू केले होते. मात्र, याठिकाणी परिस्थिती पुन्हा एकदा जैसे थे झाली असून, प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. बाजार समितीकडे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तेवढे मनुष्यबळ नाही. अनेकदा सांगूनही लोक नियम पाळत नाहीत.

उपाययोजनांसाठीची समिती झाली गायब -

दरम्यान, बाजार समिती प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन अशा उपाययोजनांसाठी 5 सदस्यीय समिती तयार केली होती. आता ही समिती देखील आता गायब झाली आहे. बाजारात येणारे व्यापारी, आडते, शेतकरी तसेच किरकोळ विक्रेत्यांसाठी प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची व्यवस्था केल्याचा बाजार समिती प्रशासनाचा दावा आहे. मात्र, ते कुठेही नजरेस पडत नाही. गर्दी टाळण्यासाठी नोंदणीकृत व्यापारी, आडते यांना सुरुवातीला ओळखपत्रे देण्यात आली. ती देखील कुणाच्या गळ्यात दिसत नाहीत.

    About us Privacy Policy
    Terms & Conditions Contact us

    • ETV
    • ETV
    • ETV
    • ETV

    Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.
    ETV

    INSTALL APP

    ETV

    CHANGE STATE

    ETV

    SEARCH

    ETV

    MORE

      • About us
      • Privacy Policy
      • Terms & Conditions
      • Contact us
      • Feedback

      Copyright © 2021 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.