
तीर्थपुरी येथे शहागड रोडवर समर्थ बेकरी आहे. या बेकरीमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा कुऱ्हाडीने खून करण्यात आला. पोलीस श्वान पथकाच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जालना - बेकरीमध्ये काम करणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ज्ञानेश्वर शेंडगे(रा. घुंगरडे हादगाव, ता. अंबड ), असे या मृत तरुणाचे नाव आहे. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीला आली. पोलिसांचे श्वानपथक घटनास्थळावर दाखल झाले असून तपास सुरू आहे.

तरुण होता बेकरी कामगार -
तीर्थपुरी येथे शहागड रोडवर समर्थ बेकरी आहे. ज्ञानेश्वर शेंडगे हा या बेकरीत कामाला होता. सोमवारी मध्यरात्री ज्ञानेश्वर शेंडगे आणि त्याचा एक सहकारी बेकरीत झोपलेले होते. सकाळी ज्ञानेश्वर शेंडगे याच्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आल्याचे समोर आले. या प्रकरणाची माहिती मिळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत पोलीस उपनिरीक्षक गजानन कौलासे, श्रीधर खेडेकर, तसेच श्वान पथक देखील उपस्थित होते. तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू आहे.