
महावितरणकडून गेल्या आठवडाभरासपासून नागरिकांना वीज बिल वसुलीसाठी वेठीस धरले जात आहे. वीज ग्राहक आर्थिक अडचणीत आहे, हे माहित असूनही बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन कट करतो, असे धमकावून जबरदस्तीने बिल वसुल केली जात आहेत.
कोल्हापूर - महावितरण आणि राज्य शासनाच्या विरोधात सोमवारी 22 फेब्रुवारीला शिरोळ तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. सक्तीने वीजबिल वसुली सुरू आहे. याच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला असून यामध्ये सर्वांनी स्वयंमस्फूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन 'आंदोलन अंकुश'कडून करण्यात आले आहे. शिवाय शिरोळ तहसील कार्यालयावर उद्या 'आंदोलन अंकुश'च्या वतीने निदर्शने सुद्धा करण्यात येणार असल्याचे धनाजी चूडमुंगे यांनी सांगितले. दरम्यान, दिवसेंदिवस विजबिलाबाबत नागरिक आक्रमक होत असून वीज बिलाबाबत तालुका बंदची हाक दिलेले हे पहिलेच उदाहरण म्हटले जात आहे.
वीज ग्राहकांना वेठीस धरले जातंय -
धनाजी चूडमुंगे म्हणाले, महावितरणकडून गेल्या आठवडाभरासपासून नागरिकांना वीज बिल वसुलीसाठी वेठीस धरले जात आहे. वीज ग्राहक आर्थिक अडचणीत आहे, हे माहित असूनही बिल भरा नाहीतर वीज कनेक्शन कट करतो, असे धमकावून जबरदस्तीने बिल वसुल केली जात आहेत. राज्य शासनाने वीज ग्राहकांना वाऱ्यावर सोडून तर दिले आहेच. मात्र, थकीत बिल वसुली करण्यासाठी वेळ पडल्यास ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची खुली छूट महावितरणला दिली आहे.
हेही वाचा - इंधन दरवाढीवरून सोनिया गांधींचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
अन्याय सहन न होणारा -
लॉकडाऊन काळातील आलेली भरमसाठ बिले, चुकीची आकारण्यात आलेले इतर कर, बेकायदेशीर आकारण्यात आलेला स्थिर आकार आणि 18% व्याज दंड व्याज आकारून आलेली बिल दुरुस्त न करता भरा, म्हणून ग्राहकांवर होत असलेला अन्याय हा सहन न होणारा आहे. ज्या ग्राहकांनी वीज बिलाच्या तक्रारी केल्या आहेत, त्यांचीही कनेक्शन बळजबरीने कट केली जात आहेत. तसेच घरगुती वीज ग्राहकांना नोटीस न काढता शिरोळ तालुक्यातील काही गावात वीज कनेक्शन कट करण्याच्या महावितरणच्या बेकायदेशीर कृती विरोधात उद्या शिरोळ तालुका बंद करण्याचे आवाहन आंदोलन अंकुशकडून करण्यात आले आहे.