
या आठवड्यात विदर्भातील ऑक्सिजनच्या मागणीत काहीशी वाढ झाली असून पुढील 15 दिवसांत मागणी वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भासाठी पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे.
मुंबई - कोरोना रुग्णांतील गंभीर रुग्णांचा आकडा कमी झाल्याने राज्यातील ऑक्सिजनची वाढलेली मागणी मागील तीन महिन्यांत खूपच कमी झाली होती. मात्र या आठवड्यात विदर्भातील ऑक्सिजनच्या मागणीत काहीशी वाढ झाली असून पुढील 15 दिवसांत मागणी वाढण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर विदर्भासाठी पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. महत्वाचे म्हणजे नागपूरमध्येच मोठा प्लांट असल्याने ऑक्सिजनच्या टंचाईचा प्रश्न उद्भवत नाही. पण जर रुग्णांची संख्या वाढत राहिली आणि ऑक्सिजनची गरज अधिक वाढली तर मुंबईवरून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, मात्र कुठल्याही परिस्थितीत ऑक्सिजन कमी पडणार नाही, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
सप्टेंबरमध्ये होती ऑक्सिजनची आणीबाणी
मार्च 2020मध्ये राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाला. त्यानंतर रुग्णांचा आकडा प्रति दिन 15 हजार, 20 हजार आणि 23 हजारावर पोहचला. एकीकडे रुग्णांना बेड, ऍम्ब्युलन्स मिळत नसल्याच्या तक्रारी होत्या. तर दुसरीकडे सप्टेंबरमध्ये ऑक्सिजनची आणीबाणी सुरू झाली. राज्यात दिवसाला वैद्यकीय वापरासाठी 400 टन ऑक्सिजनची गरज भासत होती. पण सप्टेंबरमध्ये हा आकडा थेट 800 ते 850 टनाच्या घरात गेला. मुंबई-पुण्यात ऑक्सिजनचे प्लांट असल्याने येथे तितका त्रास झाला नाही. मात्र ग्रामीण भागात, दूरच्या जिल्ह्यात ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा आहे, पण प्लांट रायगडमध्ये असल्याने ऑक्सिजनची वाहतूक करण्यास विलंब होत असल्याचे दिसून आले. मग राज्य सरकार आणि एफडीएने ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे हेच ध्येय ठेवून अनेक महत्वाच्या उपाययोजना केल्या. परिणामी ऑक्सिजनचा पुरवठा महिन्याभरात सुरळीत झाला.
आता मागणीत काहीशी वाढ
डिसेंबरपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमालीची कमी झाली. त्यातही गंभीर रुग्णांचा आकडा खूपच खाली आला. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही कमी झाली. 300 ते 350 टन ऑक्सिजन मागील आठवड्यापर्यंत राज्यात लागत होते. त्यात आता फार मोठी नाही पण काहीशी वाढ झाली आहे. 350वरून 400 टनवर मागणी गेली आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे. अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि अकोला येथे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे येथे ऑक्सिजन कमी पडणार नाही यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना हा श्वसनाचा विकार आहे. त्यामुळे रुग्ण गंभीर झाला की फुफ्फुसावर परिणाम होतो आणि मग त्याला कृत्रिम ऑक्सिजन पुरवावे लागते. त्यामुळे कोरोना काळात ऑक्सिजनची मागणी वाढती आहे.
नागपूरमध्ये 80 टन ऑक्सिजनचा प्लांट
सध्या अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि अकोल्यात रुग्ण वाढत आहेत. तर पुढचे 15 दिवस रुग्णांचा आकडा नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर वाढत राहण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी आणखी वाढू शकते. पण अशावेळी एक दिलासादायक बाब म्हणजे नागपुरात मुंबईतल्या एका आघाडीच्या कंपनीचा प्लांट आहे. या प्लांटमध्ये 80 टन ऑक्सिजन दिवसाला तयार होतो. तर छोटे प्लांट ही आहेत. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा येथे भासणार नाही, असे एफडीएचे म्हणणे आहे. मात्र दुर्दैवाने जर कोरोना रुग्ण विदर्भात वाढले आणि ऑक्सिजनची मागणी खूप वाढली तर ती पूर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण सध्या 1200 टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. तेव्हा गरज पडल्यास मुंबई आणि रायगडमधून ऑक्सिजन विदर्भातील कानाकोपऱ्यात पोहचवू असा दावा या अधिकाऱ्यांनी केला आहे.