
राज्य सरकारने मुंबई एमएमआर रिजनमधील ऑटो रिक्षाचे भाडे १८ वरून २१ रुपयांवर, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. १ मार्चपासून या भाडेवाढीच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई - दिवसागणिक वाढणाऱ्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाढीने प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. राज्य सरकारने मुंबई एमएमआर रिजनमधील ऑटो रिक्षाचे भाडे १८ वरून २१ रुपयांवर, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे. १ मार्चपासून या भाडेवाढीच्या अंमलबजावणीला सुरूवात होईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किमतींमुळे भाडेवाढ करण्यात येत आहे. ऑटो रिक्षा आणि टॅक्सीचालकांना यातून दिलासा मिळणार असला, तरी सर्वसामान्यांना याची झळ सोसावी लागणार आहे. हकीम समितीच्या सूत्रानुसार प्रत्येक वर्षी जूनमध्ये रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होत होती. या भाडेवाढीबाबत प्रवाशांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर शासनाने हकीम समिती बरखास्त करून त्याऐवजी एक सदस्यीय खटुआ समिती स्थापन केली. या समितीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ३०० पानी अहवाल सादर केला होता. हा अहवाल स्वीकारण्यास काही कालावधी लागला. या समितीच्या काही शिफारशी लागू केल्या आहेत.
मात्र, भाडेदराशी संबंधित शिफारशी लागू झालेल्या नाहीत. त्याच समितीच्या शिफारशींनुसार रिक्षा-टॅक्सी चालकांना ३ रुपयांची भाडेवाढ केली आहे. त्यामुळे, वाढलेल्या भाड्यानुसार आता ऑटो रिक्षाचे भाडे १८ वरून २१ रुपयांवर, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये होणार आहे. प्रतिकिलोमीटर रिक्षाला २.१ पैसे, तर टॅक्सीला २.९ पैसे मोजावे लागणार आहेत. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, कर्जत-कसारापर्यंत टेरिफ कार्डनुसार दर आकारावे लागणार आहेत, असे परब यांनी स्पष्ट केले. शेअर रिक्षा आणि टॅक्सीला ही भाडेवाढ लागू होणार नाही, असेही परब म्हणाले.
चुकीच्या मीटरवर कारवाई होणारच
मीटर वाढवून प्रवाशांची लूट करण्याचे प्रकार सर्रास घडतात. नियमानुसार अशा चालकांवर आणि मालकांवर कारवाई केली जाते. या पुढेही ती सुरू राहील, असे परब यांनी सांगितले. शेअर रिक्षा आणि टॅक्सीबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनामुळे मार्च ते एप्रिल दरम्यान, एकाही रुपयाचे उत्पन्न मिळाले नव्हते. त्यानंतर टॅक्सी-रिक्षा आदी खासगी वाहनांना परवानगी मिळाली. आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा असताना दिवसागणिक वाढणारे सीएनजी, पेट्रोल, डिझेल इंधन दरवाढीने कंबरडे मोडले. वाहनांचा हफ्ता, उधारी, वाहनांची देखभाल आणि विमा देखील भरमसाठ वाढला होता. मात्र, आता भाडेवाढमुळे एक दिलासा मिळेल, असे रिक्षा-टॅक्सी चालकांचे म्हणणे आहे.