
विदर्भात कोरोनाचा प्रकोप वाढत असताना नागपुरकर कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर - विदर्भात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. अमरावती आणि अकोला येथील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती गंभीर होत आहे. पण उपराजधानी नागपूरातील चित्र धडकी भरवणारे आहे. रविवारी जिथे अनेक जिल्ह्यांत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंद होता तिथे नागपुरात कोरोनाचे नियम पायदळी तुडवताना दिसले. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाचा विचार करता आगामी काळात जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढणार नाही, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्हा प्रशासन राबवत असल्याचे म्हणत आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाप्रशासनातर्फे करण्यात आले आहे. पण दुसरीकडे बाजारातील गर्दी पाहता प्रशासनाने कठोर पावले उचलण्याची गरज आहे.
शाळा बंद करण्याचे निर्देश -
नागपूरात कोरोनाचे वाढते संकट पाहता शहरात पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा बंद करण्याचे निर्देश महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिले आहे. यासोबत नववी आणि दहावीच्या वर्गासाठी परीक्षा घेणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्या परीक्षा नियमांचे पालन करून घ्याव्या, असे तिवारी यांनी म्हटले. तसेच मोठ्या प्रमाणात खासगी वर्ग सुरू आहे. या वर्गांची पाहणी करून वेळ पडल्यास हे वर्ग बंद करावे, अशा सुचना दिल्या असल्याचेही ते म्हणाले.
विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आल्यास 10 दिवसांसाठी शाळा बंद -
शाळा आणि महाविद्यालये नुकतेच सुरु करण्यात आले आहे. शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षक तसेच विद्यार्थी कोरोना पॉझिटीव्ह आल्यास पुढील 10 दिवसांसाठी ते बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिले. पॉझिटीव्ह आलेल्या शाळा-महाविद्यालयांचे निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. तसेच संबंधित तहसील कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला याबाबत माहिती द्यावी. पॉझिटिव्ह रुग्णांच्या आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या तत्काळ आरटीपीसीआर चाचण्या करुन घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळा महाविद्यालयांच्या प्रवेशद्वारावर थर्मल स्कॅनिंगने विद्यार्थ्यांचे तापमान मोजावे. तसेच कोविडची लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करुन अहवाल येईपर्यंत संबंधित शिक्षक-विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी ठाकरे यांनी दिले आहे.
जिल्हाधिकारी ग्रामीण भागात करणार दौरा -
नागपूर जिल्ह्यातील नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर आणि नागपूर ग्रामीण तालुक्यांना जिल्हाधिकारी भेटी देणार आहे. तेथे कोरोना संबंधी आढावा बैठका घेणार आहेत. नरखेड पंचायत समिती सभागृहात आढावा बैठक घेणार असून या बैठकीमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोहिमेचे नियोजन, तपासणी संख्या वाढविण्याचे नियोजन, कोविड केअर सेंटर कार्यान्वित करणे, सुपर स्प्रेडर तपासणी सद्य:स्थिती आणि मृत्यूचे अन्वेषण आदी विषयावर आढावा बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर काटोल येथे 11 वाजता, कळमेश्वर दुपारी 1 वाजता, सावनेर दुपारी 3 वाजता आणि नागपूर ग्रामीण सायंकाळी 5 वाजता, अशा आढावा बैठका घेणार आहेत. या बैठकांना पदाधिकारी तसेच अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा - आंदोलन झाल्याने कायदे रद्द होत नसतात - केंद्रीय कृषीमंत्री