
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांच्यासह काही मनसैनिकांनी आज पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या फ्रेसेनियस काबी या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली.
पुणे - महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन गोळे यांच्यासह काही मनसैनिकांनी आज पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या फ्रेसेनियस काबी या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. रांजणगाव एमआयडीसीमध्ये ही कंपनी आहे.
कंपनीतील काही कामगार हे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद आहेत. कंपनीने कामगारांवर अन्याय केल्याचे सचिन गोळे यांनी सांगितले. कामगारांना कामावरून कमी करणे, धमक्या देणे, त्यांचे राजिनामे लिहून घेणे, अशा प्रकारचे कृत्य कंपनीमार्फत सुरू होते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने कंपनी प्रशासनाशी बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, कंपनी प्रशासनाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे, आज अखेर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला खळखट्ट्याकचा मार्ग अवलंबावा लागला, असे सचिन गोळे यांनी सांगितले.