
भारताला हजारो वर्षांची संस्कृती आहे. विविध विषयांवर आधारित ज्ञानाचा मोठा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. हे ज्ञान जागतिक पातळीवर पोहचावे यासाठी आता 'युटिक्स'नावाचा प्रकल्प राबवला जात आहे.
पुणे - भारतात उपलब्ध असलेल्या पारंपरिक ज्ञानाच्या जागतिकीकरणासाठी आयसीसीआर(भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकत्र आले आहे. पुणे विद्यापीठ आणि आयसीसीआर संयुक्तपणे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. भारतात विविध प्रकार आणि विषयांमधील पारंपरिक ज्ञानाचे भांडार उपलब्ध आहे. जगभरातील नागरिकांबरोबरच भारतातील नागरिकांपर्यंत देखील ही माहिती पोहचावी यासाठी 'युनिव्हर्सलायजेशन ऑफ ट्रॅडिशनल इंडियन नॉलेज सिस्टीम' अर्थात 'युटिक्स' या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासंबंधी गुरुवारी आयसीसीआर आणि पुणे विद्यापीठ यांच्यामध्ये एक सामंजस्य करार देखील करण्यात आला.
विद्यापीठ आणि आयसीसीआरने केला करार -
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या फायनान्स कंपनीचे अध्यक्ष दीपक करंजीकर, विद्यापीठाच्या सेंटर फोर इनोव्हेशन अँड एंटरप्राईजेस विभागाच्या संचालिका डॉ. अपूर्वा पालकर आणि उपक्रमाचे कन्टेन्ट डिरेक्टर श्रीरंग गोडबोले यांच्या उपस्थितीत हा करार पार पडला. भारतीय पारंपरिक ज्ञानाबद्दल जगभरातील नागरिकांना उत्सुकता आहे. हेच लक्षात घेत भारतीय ज्ञानाच्या प्रसारासाठी प्रभावी पाऊल उचलले जावे, या दृष्टीने 'युटिक्स' या उपक्रमाला सुरुवात झाली आहे.
शंभर विषयांची माहिती उपलब्ध -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत असलेल्या कन्टेन्ट डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून या उपक्रमाची निर्मिती प्रक्रिया राबवली जाणार आहे. येत्या 13 एप्रिलला गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे. पारंपरिक भारतीय ज्ञान इंटरनेटच्या माध्यमातून सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध होणार आहे. कला, संस्कृती, भारतीय महाकाव्य, भारतीय वन्यजीवन, मंदिरांचे वास्तुशास्त्र, लोक कला व संस्कृती, योग, भारतीय पाककला, पारंपरिक नृत्य प्रकार यासारख्या शंभर विषयांवर अत्यंत साध्या सोप्या भाषेत ई-कन्टेन्ट कॅप्सूलच्या रूपातील माहिती उपलब्ध करून दिला जाणार आहे. यामध्ये प्रेझेंटेशन व्हिडिओ वाचण्यासाठी आवश्यक माहितीचाही समावेश असेल. किमान दोन तासाचे हे कॅप्सूल सध्या इंग्रजी भाषेत असून लवकरच फ्रेंच, रशियन आणि चिनी भाषेत देखील उपलब्ध करून दिले जाणार आहे.