
निवडणुकीचा फॉर्म असो की मंत्रीपदाची शपथ वनमंत्री संजय राठोड हे त्यांचे प्रत्येक शुभ कार्य करायच्या आधी पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतात. ते येथूनच आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात करतात, असेही ते म्हणाले. त्यामुळे पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले संजय राठोड हे दर्शनाकरिता पोहरादेवी येथे येणार आहेत.
वाशिम - पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड हे काही दिवसांपासून नॉटरिचेबल होते. मात्र, ते बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीच्या दर्शनासाठी येणार आहेत. यावेळी ते याप्रकरणी काही बोलू शकतात, अशी शक्यता पोहरादेवी येथील महंत जितेंद्र महाराज यांनी वर्तवली आहे. ते ईटीव्ही भारतसोबत बोलत होते.
मंत्री राठोड उद्या काय बोलणार?
निवडणुकीचा फॉर्म असो की मंत्रीपदाची शपथ वनमंत्री संजय राठोड हे त्यांचे प्रत्येक शुभ कार्य करायच्या आधी पोहरादेवी येथे दर्शनासाठी येतात. ते येथूनच आपल्या प्रत्येक कार्याची सुरुवात करतात, असेही ते म्हणाले. त्यामुळे पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अडचणीत आलेले संजय राठोड हे दर्शनाकरिता पोहरादेवी येथे येणार आहेत. ते मंगळवारी साडेअकरा वाजताच्या सुमारास पोहरादेवी येथे पोहोचणार आहेत. दर्शनानंतर ते माध्यमांशी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावर बोलतील का? असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे.
हेही वाचा - पूजा चव्हाण प्रकरण : अरुण राठोडच्या अटकेनंतरच गुढ उकलणार
संजय राठोड यांच्या संदर्भात अद्यापि प्रशासनाचा अधिकृत दौरा आला नसल्याने ते पोहरादेवीला येणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही आहे. मात्र, महंतांनी आम्हाला त्यांच्या कार्यालयाकडून अधिकृत माहिती असल्याचे यावेळी सांगितले. दरम्यान, सध्या वाशिम जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. यामुळे इथे जास्त लोकांनी येऊ नये, असे आवाहन यावेळी महंत जितेंद्र महाराज यांनी केले.
काय आहे प्रकरण -
पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.